Home Breaking News देसाईगंजमध्ये लाखोंचा खर्च अन् मैदानात फक्त गट्टू-तार फेन्सिंग ; ‘कुंपणच मैदान खातंय’...

देसाईगंजमध्ये लाखोंचा खर्च अन् मैदानात फक्त गट्टू-तार फेन्सिंग ; ‘कुंपणच मैदान खातंय’ चर्चा रंगली

649

देसाईगंजमध्ये लाखोंचा खर्च अन् मैदानात फक्त गट्टू-तार फेन्सिंग ; ‘कुंपणच मैदान खातंय’ चर्चा रंगली

लोकवृत्त न्यूज
देसाईगंज :- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ गडचिरोली मार्फत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत देसाईगंज शहरातील हनुमान वॉर्ड येथे आमदार रामदास मसराम यांच्या घरासमोरील खुल्या मैदानात गट्टू व तार फेन्सिंगचे बांधकाम करण्यात आले आहे. सुमारे ८ लाख ३८ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चातून हे काम करण्यात आले असले तरी आता या कामावरून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक नागरिकांकडून या कामावरून “कुंपणच मैदान खातंय” अशी उपरोधिक टीका करण्यात येत आहे. मैदानाभोवती गट्टू व तार फेन्सिंग उभारण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या कामावर इतका मोठा खर्च झाला असेल का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या माहिती फलकावर काम सुरू दिनांक नमूद नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सदर मैदानात गट्टू व तार फेन्सिंग व्यतिरिक्त अन्य कोणतीही ठोस विकासकामे करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
मैदानाच्या भोवताली फक्त गट्टू आणि तार फेन्सिंग तर मध्यभागी ढोबर व अस्वच्छ अवस्थेतील जागा असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे लाखोंचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात मैदानाच्या सौंदर्यीकरणासाठी किंवा नागरिकांच्या सुविधांसाठी नेमकी कोणती कामे झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, मैदानाभोवती फेन्सिंग झाल्यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळाले असून नागरिकांना शतपावलीसाठी सुविधा निर्माण झाली आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत कामाचे स्वरूप अत्यंत मर्यादित असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत असून या कामाच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

Don`t copy text!