Home Breaking News गडचिरोली : बालिकेवरील अत्याचाराविरोधात मनसे आक्रमक

गडचिरोली : बालिकेवरील अत्याचाराविरोधात मनसे आक्रमक

396

गडचिरोली : बालिकेवरील अत्याचाराविरोधात मनसे आक्रमक

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : येथील ७ वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या अमानुष घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) गडचिरोली जिल्ह्याने तीव्र निषेध नोंदविला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनविसेने दिला आहे.
मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश संतोषवार यांच्या नेतृत्वात चामोर्शी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात घराच्या रंगकामासाठी आलेल्या आरोपीने केलेले कृत्य हे मानवतेला काळिमा फासणारे असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून गुन्हा दाखल केल्याबद्दल मनविसेने समाधान व्यक्त केले असले तरी तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय, तांत्रिक आणि इतर सर्व पुरावे भक्कमपणे संकलित करून आरोपीला कोणतीही कायदेशीर पळवाट मिळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच पीडित बालिकेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसोपचार सेवा आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाशी संबंधित नसून संपूर्ण समाजातील लेकी-बाळींच्या सुरक्षेशी निगडित असल्याचे मनविसेने स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा झाला किंवा आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपूर्ण जिल्हाभर तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभारेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

Don`t copy text!