लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ७ जून : राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्तापी संस्था पुणे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा अंतर्गत सुरू असलेल्या आरोग्यासाठी सामाजिक कृती प्रकल्प अंतर्गत तालुका स्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमात आरोग्य सेवांसह विविध समस्या व प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्तापी संस्थेचे राज्य समन्वयक बालाजी वाघ होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, ॲड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, गावपातळीवर अपुरा औषधी साठा असणे, उपकेंद्रातील पाण्याची सुविधा नाही, प्रसूतिगृहाची सोय नाही, १०८ ची सुविधा वेळेवर उपलब्ध न होणे, प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ न मिळणे या विषयावर जनसंवाद कार्यक्रमात मुद्दे मांडण्यात आले. गावातील लोकांनी गावात असलेल्या आरोग्य अडचणींविषयी प्रश्न मांडले. या प्रश्नांवर जिल्हा स्तरावरून औषध साठा, उपकेंद्र बांधकाम करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. स्थानिक मुद्दे राज्य पातळीवर मांडून ते सोडविण्यात येतील, असे बालाजी वाघ यांनी सांगितले. जनसंवाद कार्यक्रमात अंगणवाडीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नवीन अंगणवाडी बांधकाम, पावसाळ्यात गळती, किचन शेड बांधकाम व दुरुस्ती, अंगणवाडीत नवी फरशी बसविणे याविषयी काही प्रस्ताव देण्यात आले आहेत, असे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा खूप सुंदर आहे. आरोग्य हा विषय खूप महत्वाचा आहे, त्यासाठी गावपातळीवर आरोग्य सेवा, औषधी साठा का पुरेशा प्रमाणात का उपलब्ध होत नाही, आणि माझ्या आई- बहिणींचे प्रश्न का सोडविले जात नाहीत, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कविता मोहरकर यांनी जनसंवाद कार्यक्रमात मांडले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, सामाजिक कार्यकर्या ॲड. कविता मोहरकर ,डॉ. नरोटे, डॉ. कुमरे, डॉ. कासर्लावार, डॉ, करेवार, जिल्हा समन्वयक शुभदा देशमुख, जिल्हा पर्यवेक्षक विजयालक्ष्मी वघारे, रचना फुलझेले, तालुका समन्वयक संदीप लाडे, सरपंच, सीएचओ, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य दूत उपस्थित होते.

