लोकवृत्त न्यूज १५ जुलै अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख संपर्क.७४९८३४३१९६
शेवगाव येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष बी.सी. एस, बी.सी.ए, बी.कॉम, बी.एस्सी व बी.ए या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे. या स्वागत समारंभ कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रा.लक्ष्मणराव बिटाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभागाच्या प्रमुख प्रा.वंदना पुजारी, आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. मच्छिंद्र फसले, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे आर्थिक विभाग प्रमुख गोविंद वाणी व निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.ए.दुकळे हे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. दुकळे यांनी बोलताना सांगितले की, नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तीन वर्ष अथक परिश्रम घेतले तर पुढील आयुष्य सुकर होईल. यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी रविवारी सुद्धा वेग वेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना व्याख्यानासाठी बोलावले जाते. ही अनोखी संकल्पना महाविद्यालयात राबवली जाते. तसेच अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ म्हणाले की, उच्च शिक्षण हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे शिक्षण आहे म्हणून विद्यार्थ्यांची ही सुरुवात आहे व प्रवेश घेतल्यापासून वेगवेगळे कला कौशल्य विकसित करून रोजगार मिळवण्याचे ध्येय मनाशी बाळगून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे.संस्थेने विविध अभ्यासक्रम सुरू केलेले असून पालकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून आधार द्यावा असे अवाहन केले व प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. मच्छिंद्र फसले प्रा.वंदना पुजारी, प्रा. वाणी सर यांनीही आपली मनोगते व्यक्त करून प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व इतर कर्मचारी तसेच सर्व शाखेतील विद्यार्थी व त्यांच्या समवेत आलेले पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निजवे संतोष व प्राध्यापिका गुंड स्वाती यांनी केले. आभार प्रा. प्रशांत वाघ यांनी मानले.


