फडणवीसांच्या हवाई दौर्यावर काँग्रेसचा टोला – ‘हेलिकॉप्टर घ्या, पण गावात या’
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २६ जून :- गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केवळ हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमांना हजेरी लावण्याच्या भूमिकेवर काँग्रेसने आज चोख टोला लगावला. जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली “हेलिकॉप्टर घ्या, पण गावात या, साहेब!” या घोषवाक्यांसह, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात जिल्हाभरात एक आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं.
जिल्ह्यात वादळ, रानटी हत्तींचा त्रास, खाण प्रकल्पांची धुळी, अपघातग्रस्त रस्ते, खराब सार्वजनिक वाहतूक, प्रलंबित शासकीय देयके, खंडित वीजपुरवठा आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्या तीव्र होत आहेत. मात्र, प्रशासन आणि पालकमंत्र्यांकडून प्रत्यक्ष भेटी व संवादाऐवजी फक्त ‘हवाई भेटी’ सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसतर्फे विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती व निवेदन देण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात पार पडले.
आंदोलनात आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, विविध सेलचे पदाधिकारी, शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रशासनाला जमिनीवर उतरून जनतेशी थेट संवाद साधण्याची मागणी केली.
“साहेब, हेलिकॉप्टरने या हरकत नाही, पण गडचिरोलीच्या खऱ्या जमिनीवरही या – इथल्या मातीचा श्वास घ्या, जनतेच्या वेदना ऐका,” असा स्पष्ट संदेश काँग्रेसने यावेळी दिला.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police @Congress @Devendra fadnavis)










