– मोकाट जनावरांवर नियंत्रणाची विनंती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (प्रतिनिधी) :- गडचिरोली शहरातील दुकाने, संस्थांचे फलक व पाट्यांवर मराठी भाषेचा अभाव आढळून येत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आज मनविसेच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मराठी पाट्यांबाबत तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान शहरातील गटर लाईन संदर्भात असलेल्या अडचणी तसेच मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे होणारा संभाव्य अपघाताचा धोका यावरही सविस्तर चर्चा झाली. मोकाट जनावरांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी मनविसेने केली.
मुख्याधिकाऱ्यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, “लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्यात येईल,” असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर अंकुश संतोषवार, शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, उपशहराध्यक्ष आशिष खडसे, सचिव आकाश कुळमेथे, पवन कोसणकर, प्रसाद आसमवार व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मराठी भाषा आणि नागरी समस्यांबाबत जागरूकता दाखवत मनविसेने पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @मनसे #RajThackeray #नगरपरिषद गडचिरोली)

