– दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे अर्धा क्विंटल गांजा जप्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- गडचिरोली पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे ५०.५१३ किलोग्रॅम वजनाचा सुमारे ५.०५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून केली.
पहिली कारवाई कुरखेडा तालुक्यातील धनेगाव येथे कालिदास पांडुरंग मोहुर्ले यांच्या राहत्या घरावर शासकीय पंचासमक्ष छापा टाकला असता, ४०.८३५ किलोग्रॅम वजनाचा, अंदाजे ४,०८,२५० रुपयांचा गांजा स्वयंपाक खोलीतील एका कोपऱ्यात साठवून ठेवलेला आढळून आला.
दुसरी कारवाई पुराडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कातलवाडा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक दौंड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, तारेश्वर भोपाल चांग याच्या वडिलांच्या घरात तपासणी करण्यात आली. तपासात ९.६७८ किलोग्रॅम वजनाचा, ९६,७८० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(बी) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीमार्फत पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात दोन्ही आरोपींच्या गुन्ह्यात परस्पर संबंध नसल्याचे निष्पन्न झाले असून, ही दोन स्वतंत्र प्रकरणे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )

