बहुजन हक्कांसाठी ठाम भूमिका
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ :– राज्यातील बहुजन समाजाशी थेट संवाद साधत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने निघालेली मंडल यात्रा आता गडचिरोलीत दाखल झाली आहे. ही यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राज राजपुरकर यांनी दिली. इंदिरा गांधी चौक येथील स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजपुरकर यांनी सांगितले की, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नागपूर येथून हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेदरम्यान शेतकरी, महिला आणि ओबीसी बांधवांशी संवाद साधला जात असून, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत देऊन ओबीसी बांधवांचा सन्मान केला जात आहे. नागपूर–चंद्रपूर मार्गे प्रवास करत यात्रा गडचिरोलीत दाखल झाली आहे.
मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजपुरकर म्हणाले, “देशात व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोग लागू झाला. त्याला भाजपाने विरोध केला होता. मात्र राज्यात ओबीसी आरक्षणाची भूमिका सर्वप्रथम शरद पवार यांच्या पक्षाने घेतली. आजही आम्ही बहुजनांच्या हक्कांसाठी लढत आहोत. कितीही विरोध झाला तरी रोजगार वाढ, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, जिल्ह्यात उद्योग-कारखाने उभारणे हा आमचा ठाम निर्धार आहे.”
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सरचिटणीस ॲड. संजय ठाकरे, विजय गोरडवार, शेमदेव चापले, नईन शेख, हुसेन शेख, वसंत गोंगल, सदाशिव भांडेकर, चंद्रकांत शिवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.










