शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या दलालांवर कडक कारवाई करा

61

– भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३० :- गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना उद्योगासाठी जमीन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला असून, अशा दलालांवर तात्काळ कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी आविष्कार पांडा व पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. होळी यांनी निवेदनात स्पष्ट केले की, जिल्ह्यात अनेक भागात – अहेरी, आलापल्ली, इल्लुर, भेंडाळा, मार्कडादेव, आमगाव (महाल), घोट, रेखेगाव, निमडरटोला, जामगिरी, आरमोरी, वडसा आदी परिसरात – शेतकऱ्यांना “जमीन द्या, मोबदला व नोकरी मिळेल” असे फसवे आश्वासन देऊन काही दलाल परस्पर जमिनी विकत घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून भविष्यात उपासमारीचे संकट ओढवू शकते.
त्यांनी उदाहरण देत इल्लुर येथील पेपर मिलचा संदर्भ मांडला. “शेतकऱ्यांनी दलालांच्या आमिषाला बळी पडून आपली जमीन विकली. मात्र आज पेपर मिल बंद आहे, नोकरी गेली, आणि वडिलोपार्जित जमीनही हुकली. अशीच परिस्थिती इतरत्र उद्भवू नये म्हणून सरकार व प्रशासनाने दलालांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे,” असे डॉ. होळी यांनी अधोरेखित केले.
डॉ. होळी यांनी आठवण करून दिली की, “मी आमदार असताना गडचिरोली जिल्ह्यात उद्योगक्रांती यात्रा काढली होती. त्यातूनच सूरजागड लोहखाणीवर आधारित कोनसरी प्रकल्प सुरू झाला. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत स्टील हब उभारणीसाठी अनेक उद्योजक येत आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरील व स्थानिक दलालांनी आपले जाळे टाकले आहे.”
त्यामुळे, शेतजमीन खाजगी व्यक्तींना विकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी MIDC च्या अधिकृत अधिसूचनेची वाट पाहावी, असे आवाहन करून जिल्ह्यात फसवेगिरी करणाऱ्या दलालांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी डॉ. होळी यांनी प्रशासनाकडे केली आहे.