गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा वर्षांपासून सक्रीय असलेला जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय २५, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर, छ.ग.) याला हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक केली. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
शंकर हा नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या खुनात प्रत्यक्ष सहभागी होता. याशिवाय येडदर्मी (२०२०), मडवेली (२०२१), वेडमपल्ली (२०२३) आणि चितवेली (२०२४) येथील पोलिसांशी झालेल्या चकमकींमध्येही त्याचा सहभाग होता. तो २०१८ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाला होता. त्यानंतर डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ असाम यांचा अंगरक्षक तसेच पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता.
गोपनीय माहितीच्या आधारे सी-६० पथक आणि तांत्रिक इंटेलिजन्स शाखेने ४ सप्टेंबर रोजी शंकरला हैद्राबाद येथे ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात अप.क्र. 0411/2023 भादंवि कलम 302, 147, 148, 149, 120 (ब) सह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. गडचिरोली पोलिसांच्या तीव्र मोहिमेमुळे जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १०८ माओवादी अटकेत आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @naxal_chakmak @naxal #Maharashtra

