गडचिरोली : पोलिसांची रेकी करीत असलेल्या जहाल नक्षलीस अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १४ -: जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात पोलिसांची रेकी करीत असलेल्या जहाल नक्षलीस १३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली आहे. शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय ३२ वर्षे, रा. परायनार, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे इतका करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे.
गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 109 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
१३ सप्टेंबर रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत ताडगाव हद्दीतील तिरकामेटा जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना सदर जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले. अधिक चौकशी दरम्यान समोर सदर इसम हा पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. यास 21 जानेवारी 2022 रोजी पोस्टे धोडराज हद्दीत धोडराज ते इरपनार मार्गे पेनगुंडा रत्स्याच्या कामावर असलेल्या एकूण 2 कोटी रुपये किंमतीच्या 19 वाहनांची माओवाद्यांनी जाळपोळ केल्याच्या घटनेवरून उपपोस्टे लाहेरी येथे दाखल अप क्र. 01/2022 अन्वये काल 13/09/2025 रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 01 जाळपोळ, 01 खून व इतर-02 असे एकूण 04 गुन्हे दाखल आहेत.
त्याचा माओवादी कार्यकाळ पाहता तो 2016 ते 2021 पर्यंत जनमिलीशियामध्ये कार्यरत होता. नंतर 2021-22 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती होऊन 2022 पासून परायनार व आसपासच्या परिसरात पोलीसांची माहिती गोळा करणे आणि हिंसक कारवायांमध्ये थेट सहभाग घेणे हे काम तो करत होता.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अजय कोकाटे, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, पुन्हा एकदा माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Gadchirolipolice @naxal_chakmak #naxal #Maharashtra

