गडचिरोली विधानसभेत रस्ते दुरुस्ती, मोकाट जनावरांचा बंदोबस्त व प्रवासी निवाऱ्याची मागणी

40

– मनसेकडून आमदार नरोटे यांना निवेदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १६ :- गडचिरोली विधानसभाक्षेत्रातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनचालक व नागरिकांना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांची त्यांच्या कार्यालयात नुकतीच भेट घेतली. या भेटीत रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहनांचे होणारे नुकसान याबाबत आमदारांना सविस्तर माहिती देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, चामोर्शी बसस्थानक येथे प्रवाशांसाठी निवाऱ्याची उभारणी, गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा बंदोबस्त, तसेच शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स व आस्थापनांवर मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याबाबत संबंधित कार्यालये व अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
या प्रसंगी आमदार नरोटे यांनी वरील सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करत संबंधित विभागांना तातडीने निर्देश दिले जातील आणि नागरिकांच्या अडचणींचा लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीवेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. अंकुश संतोषवार, शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, सचिव आकाश कुळमेथे, संतोष राजकोंडावार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#Lokvrutt_News @Lokvrutt.com @Gadachirolinews @Gadchirolipolice #मनसे #आमदार