श्री फाउंडेशन तर्फे वृद्धाश्रमात नवरात्र उत्सव
– वृद्ध माऊलींची ओटी भरून साजरी भक्तीमय परंपरा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२८ :- शौर्य, तेज आणि विजयाचे प्रतीक असलेल्या देवी दुर्गामातेला वंदन करीत श्री फाउंडेशनतर्फे यंदाही नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ माऊलींची ओटी भरून त्यांना मातृसन्मान देत हा उत्सव आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारा ठरला.
या प्रसंगी श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा पायल श्रीकांत कोडापे, उपाध्यक्षा भाग्यश्री गड्डमवार, सचिव मंजू कोडापे, कोषाध्यक्षा सरिता चुधरी यांच्यासह मिथिला धांडे, प्रणोती बनकर, हर्षाली धाईत, स्वाती करपे, संध्या पवार, सोनाक्षी अवसरे, वासंती कांबळे, प्रिया देशमुख, वैशाली मुंनघाटे आदी सदस्यांनी उपस्थित राहून वृद्धांना आनंदाचा हात दिला.
श्री फाउंडेशनतर्फे नवरात्र उत्सवाचे सामाजिक भान जपणारे हे उपक्रम दरवर्षी राबवले जात असून, यामुळे उत्सवाला समाजसेवेची जोड मिळत आहे.










