गडचिरोली : पाच वर्षे नगरपरिषद- राज्यातही ‘ती’च सत्ता… तरीही विकास शून्य, आता मात्र आश्वासनांचा पाऊस

631

नागरिकांचा सवाल – तेव्हा नाही केले, तर आता काय करणार?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीची धामधूम वाढत असताना शहरात चर्चांचा जोरदार फटका बसू लागला आहे. गेली पाच वर्षे नगरपरिषदेत एकहाती सत्ता आणि त्याच सत्ताधाऱ्यांची राज्यातही सत्ता असतानाही गडचिरोली शहराचा विकास ठप्प राहिला, अशा शब्दांत नागरिक आपला तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

प्रचाराची धुरा अलीकडेच हातात घेतलेल्या उमेदवारांकडून मोठमोठी आश्वासने, विकासाचे गोडवे, नव्या योजनांची बडबड ऐकायला मिळत असली तरी जनतेला गत पाच वर्षांची निराशाजनक वास्तवस्थिती अधिक भासू लागली आहे. “जेव्हा नगरपरिषदेत आणि राज्यात तुमचीच सत्ता होती, तेव्हाही समस्या सुटल्या नाहीत… मग आता कशाच्या जोरावर आश्वासने देता?” असा थेट आणि ठाम सवाल नागरिक करत आहेत.

शहरातील स्वच्छतेचा बोजवारा, चाळण झालेली रस्तेव्यवस्था, अतिक्रमणाचा वाढता वेग, पाणीपुरवठ्यातील अडचणी, पावसाळ्यात तुंबणारे नाले, वाहतुकीतील गोंधळ आणि शहर नियोजनाचा बहरलेला विस्कळीतपणा—जे प्रश्न पाच वर्षांपूर्वी होते, तेच आज अधिक भीषण स्वरूपात उभे आहेत.

याशिवाय, गत सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेली अनेक आश्वासने केवळ कागदी राहिली. कोणत्याही समस्येवर ठोस निर्णय किंवा ठोस काम प्रत्यक्षात दिसून आले नाही. “तेव्हा केवळ आश्वासनांची खैरात झाली… आणि आज पुन्हा त्याच आश्वासनांचा भडीमार चालू आहे” अशी बोचरी टीका नागरिकांतून ऐकू येत आहे.

गृहभेटींमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर, बाजारपेठांत, चौकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे—सत्तेची सोय असताना केले नाही, तर आता तरी काय वेगळे होणार? नागरिक दबक्या आवाजात ही नाराजी एकमेकांशी बोलून दाखवत आहेत.

अनेक नागरिकांचे मत असेही व्यक्त होताना दिसते की, “या वेळी इतर उमेदवारांना संधी द्यावी; शहराला नवे चेहरे, नवी ऊर्जा आणि प्रत्यक्ष काम करणारी टीम हवी.”

निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी जनतेतील नाराजी, चर्चा आणि सत्ताधाऱ्यांवरील अविश्वासाचा सूर अधिक तीव्र होताना दिसतोय. शहरभर एकच मुद्दा जोरदार फिरत आहे—
“पाच वर्षे काही झाले नाही… आता तरी होणार आहे का?”