श्री फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्सव उत्साहात

223

श्री फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्सव उत्साहात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ : नव्या वर्षातील पहिला सामाजिक उत्सव म्हणून श्री फाउंडेशनच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्सव–२०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “आम्ही सावित्री–जोतिबा, समतेचा चालवू वारसा” या प्रेरणादायी संकल्पनेतून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात समाजातील एकल महिला भगिनींना विशेष सन्मान देण्यात आला. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी–कुंकू समारंभ, भेटवस्तू आणि सणोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादरीकरणांनी वातावरण आनंदी झाले. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.


कार्यक्रमाला श्री फाउंडेशनच्या अध्यक्ष इंजि. पायल श्रीकांत कोडापे, उपाध्यक्ष भाग्यश्री गडमावर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई नरोटे मॅडम व रश्मी आखाडे मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिया देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंदना विघम यांनी केले. या उपक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक समता, स्त्री सशक्तीकरण व महिलांच्या आत्मसन्मानाचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.