गडचिरोली : अतिदुर्गम बिनागुंडात नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ : माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भागांनी वेढलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागांतर्गत बिनागुंडा येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस मदत केंद्राची यशस्वी उभारणी करण्यात आली. उपपोलीस ठाणे लाहेरीपासून सुमारे १७ किमी व छत्तीसगड सीमेलगत केवळ ८ किमी अंतरावर असलेल्या या दुर्गम भागात पोलीस मदत केंद्र उभारणे हे सुरक्षा व विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
या पोलीस मदत केंद्राच्या उभारणीसाठी सी–६० कमांडो, बीडीडीएस पथके, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूण १०५० मनुष्यबळ, ११ जेसीबी, १० ट्रेलर, ५ पोकलेन व ४० ट्रक यांच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात हे केंद्र उभे करण्यात आले.
नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, सीआरपीएफ ०९ बटालियनचे कमांडंट शंभु कुमार, तसेच वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “या पोलीस मदत केंद्रामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचेल. सुरक्षिततेसोबतच विकासाला चालना मिळून नागरिक मुख्य प्रवाहात येतील.”
२०२३ पासून निर्माण झालेली सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी सुरू असलेल्या साखळीतील हे दहावे पोलीस मदत केंद्र असून, यापूर्वी नेलगुंडा, कवंडे, फुलनार कॅम्प (गुंडूरवाही) व तुमरकोठी येथे नवीन पोलीस ठाणे व मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
या पोलीस मदत केंद्रात वायफाय सुविधा, ८ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, आरओ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉवर, शौचालय सुविधा, मॅक वॉल, बी.पी. मोर्चा व सॅन्ड मोर्चे उभारण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी ४ अधिकारी व ५६ अंमलदार, एसआरपीएफचे २ प्लाटून, सीआरपीएफचे ७९ जवान तसेच सी–६० चे ८ पथक (२०० कमांडो) तैनात करण्यात आले आहेत.
उभारणीदरम्यान आयोजित जनजागरण मेळाव्यात महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅंकेट, स्वयंपाक साहित्य, युवकांना टी-शर्ट व शालेय साहित्य तर मुलांना विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या पोलीस मदत केंद्रामुळे भविष्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम, ७ मोबाईल टॉवर प्रकल्प, गुंडेनूर नाल्याचे बांधकाम तसेच एस.टी. बस सेवा सुरू होण्यास गती मिळणार आहे. पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत संपर्क तुटणाऱ्या गावांना आता दिलासा मिळणार असून, नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
@lokvrutt.com#lokvruttnews #gadchirolinews #gadchirolipolice #binagunda














