अहेरी : ट्रकची चारचाकीला जोरदार धडक, लाखोंचे नुकसान

83

• पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

लोकवृत्त न्यूज
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच अहेरी तालुक्यात रविवारी (दि. २७ एप्रिल) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास महागाव नजीक नदीजवळ भीषण अपघात घडला. गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एमएच 12 PQ 8741 क्रमांकाच्या ट्रकने समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनाचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेत महिला व एका चिमुकलीस किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टीकडून अहेरीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना चारचाकी वाहन एका ट्रकच्या मागे थांबले होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय

अपघातानंतर अहेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. ट्रकचालकावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी उलट चारचाकी वाहनधारकांनाच समज देत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
चारचाकी वाहनधारकांनी नुकसानभरपाईची मागणी करताच संबंधित गॅस एजन्सी धारकाने अरेरावी करत धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनीही एजन्सीधारकाला जाब न विचारता वाहनधारकांनाच “केस झाली तर कोर्ट-कचेरीच्या तारखा लागतील” असे सांगून दबाव आणल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

“तुमच्यामुळे वाहतूक बंद पडली”

रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. मात्र, अपघातास कारणीभूत ट्रकवर कारवाई करण्याऐवजी “तुमच्यामुळे वाहतूक बंद पडली” असे सांगत पोलिसांनी चारचाकी वाहनधारकांनाच दोष देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा?

या घटनेनंतर सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रभावशाली व्यक्तींच्या दबावाखाली पोलिसांनी भूमिका घेतली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघातात निष्पाप कुटुंबीय जखमी झाले, वाहनाचे मोठे नुकसान झाले, तरीही जबाबदारांवर कारवाई न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अहेरी मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून वारंवार अपघात होत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.