Home Breaking News गडचिरोलीत ‘रॉंग साईड’ चालकांवर धडक कारवाई

गडचिरोलीत ‘रॉंग साईड’ चालकांवर धडक कारवाई

307

• अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस सक्रिय ; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

लोकवृत्त न्यूज गडचिरोली : शहरातील वाढती वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन लक्षात घेता वाहतूक पोलिस विभागाने आता चुकीच्या बाजूने वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि दुभाजक असलेल्या रस्त्यांवर ‘रॉंग साईड’ने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

गडचिरोली शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक सिग्नल आणि रस्ता दुभाजक असूनही काही वाहनचालक नियमांना हरताळ फासत चुकीच्या बाजूने वाहन चालवत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत होते. यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नोंद वाहतूक विभागाने घेतली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आता नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईला सुरुवात केली आहे.

विशेषतः शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असून, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबवून चालकांकडून दंड वसूल केला जात आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना समज देतानाच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येत असून, वाहनचालकांमध्येही नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. अनपेक्षित अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Don`t copy text!