• ओडिशातील तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
एटापल्ली : एटापल्ली-हालेवारा मार्गावरील देवदा गावाजवळ एका ३२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवरील बनावट (फेक) आयडीद्वारे झालेल्या ओळखीमधून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत युवकाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रसाद निशाद (वय ३२), रा. नागेपल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे आहे. तर आरोपी म्हणून सूरज हलदार मिरगान (वय २१), रा. नौकोठे, ता. पापाराहंडी, जि. नवरंगपूर, ओडिशा याचे नाव समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवरील एका मुलीच्या बनावट आयडीच्या माध्यमातून मृतकाशी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली होती. आरोपी अनेकदा ओडिशातून नागेपल्ली व आलापल्ली परिसरात मृतकाला भेटण्यासाठी येत होता. मात्र मृतक विवाहित असल्याने आरोपीची वाढती जवळीक त्याला मान्य नव्हती.
३० मे रोजी आरोपी आलापल्ली येथे आला असता दोघांमध्ये वाद झाला होता. आरोपी मृतकाच्या कुटुंबीयांना व मित्रांना त्यांच्या संबंधांबाबत चुकीची माहिती देत असल्याचा जाब मृतकाने विचारला होता. त्यावेळी पुन्हा असे करू नये, तसेच गावाकडे परत जावे, असे मृतकाने आरोपीला सांगितले होते. मात्र रात्री उशीर झाल्याने आरोपीने दुसऱ्या दिवशी परत जाणार असल्याचे सांगत मृतकाचा मित्र फैजल खान यांच्या बोलेरो वाहनात मुक्काम केला.
३१ मे रोजी सकाळी आरोपीने पाखांजूरपर्यंत सोडण्याची विनंती केल्यानंतर मृतक स्वतःच्या तांबूस-लाल रंगाच्या ब्रेझा कारने त्याला घेऊन निघाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास एटापल्ली-हालेवारा मार्गावरील देवदा गावाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक स्वरूपात झाले आणि आरोपीने धारदार चाकूने मृतकाच्या गळ्यावर व शरीराच्या वरच्या भागावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
घटनेनंतर मृतक गंभीर जखमी अवस्थेत वाहनाजवळ आढळून आला. तपासादरम्यान आरोपीने धारदार शस्त्राने वार करून सतीशकुमार निशाद यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी सरोज जगदीशप्रसाद निशाद (वय ४२), रा. चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हालेवारा पोलीस मदत केंद्रामार्फत सुरू असून घटनेमुळे अहेरी-एटापल्ली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.














