बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारे चौघे अटकेत

402

– गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ जुलै :- सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या चौघा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केवळ एका दिवसात अटक केली. आरोपींकडून दोन देशी बनावटीच्या बंदुका, ११ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ट्रक चालक रामभरोस सिताराम हे ट्रक चिखलात अडकल्याने सावरगाव-मुरुमगाव मार्गावर गाडीमध्ये झोपलेले असताना, २१ जुलै रोजी मध्यरात्री १.३० ते २.०० वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी ट्रकच्या कॅबिनमधून त्यांना बाहेर काढून बंदुकीचा धाक दाखवत मोबाईल हिसकावून घेतला. तसेच डिझेल काढून देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या छातीवर व डोक्यावर बंदुका ठेवत धमकावले व पळ काढला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून मुरुमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपासाची जबाबदारी सावरगाव पोलीस ठाण्याला दिली. पोउपनि. विश्वंभर कराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती व साक्षीदारांच्या मदतीने मौजा गजामेंढी, ता. धानोरा येथून अशोक सुखराम बोगा (३०), घुमनसाय बैजुराम गावडे (३३) आणि सुकालु आसाराम कोमरा (३२) यांना ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी वापरलेल्या बंदुका छत्तीसगडमधून आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बसंतकुमार कल्लो (४१, रा. नवागाव कोंडल, जि. कांकेर, छत्तीसगड) यालाही अटक करण्यात आली. सर्व आरोपींना २२ जुलै रोजी अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धानोरा यांच्यासमोर हजर केले असता, २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत दोन देशी बनावटीच्या बंदुका, ११ नग काडतुसे, मोबाईल व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. विश्वंभर कराळे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता विभाग) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकामध्ये पोउपनि. राजेंद्र कोळेकर, पोहवा वानखेडे, नापोअं तुलावी, पोअं काळबांधे, मपोअं श्रीरामे, तसेच कर्मचारी लेकामी व करसायल यांचा समावेश होता.
गडचिरोली पोलिसांची ही जलद कारवाई हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal)