प्रवेशद्वार बांधकामामुळे गोगाववासीयांचे हाल – पर्यायी मार्गावर चिखल

117

– ग्रामस्थांचा रोष

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून काहीच अंतरावर असलेल्या गोगाव येथे सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर टाकलेल्या मुरुमामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, गावात जाणे-येणे नागरिकांसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे.
गोगाव येथे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने प्रवेशद्वार मंजूर झाले असून, त्याचे काम ग्रामपंचायत हाती घेतले आहे. भूमिपूजनाला आठ-नऊ महिने उलटून गेले तरी दीर्घकाळ काम बंदच होते. उन्हाळ्यात हे काम व्हायला हवे होते; मात्र ग्रामपंचायतीने पावसाळ्याच्या तोंडावर बांधकाम सुरू केल्याने नागरिकांना अडचणीत टाकले आहे. पर्यायी रस्ता व्यवस्थित तयार न करता सुरू झालेल्या या कामामुळे गोगावसह महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा आणि नवरगाव येथील ग्रामस्थांना अडपल्लीमार्गे फेरा मारून गावात जावे लागत आहे.
ग्रामस्थांनी रोष व्यक्त करताच ग्रामपंचायतीने मार्गावर मुरुम टाकले, पण पावसामुळे सर्वत्र चिखल पसरत असल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक व किचकट झाला आहे.

कर भरूनही रस्त्याचा वांधा

गोगावसह आसपासच्या गावातील नागरिकांनी पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी अनेकदा केली, तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रवेशद्वाराच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असून, “कर भरतो पण रस्ताच नाही” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.