शासनाचे आदेश धडकले तरीही अनेक कार्यालयांत ओळखपत्रांचा अभाव

264

 “हे खरेच शासकीय कर्मचारी आहेत का?”

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :-  महाराष्ट्र शासनाने अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात ओळखपत्र लावणे सक्तीचे केले असले, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांत या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
आमच्या प्रतिनिधीनी केलेल्या पाहणीत विविध कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी हे ओळखपत्राशिवाय कामकाज करताना दिसून आले. काही कर्मचाऱ्यांना तब्बल दीड वर्ष उलटून गेले तरी ओळखपत्रच मिळालेले नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना तर अजूनही ओळखपत्रच देण्यात आलेले नाही. त्यामुळे “हे खरेच शासकीय कर्मचारी आहेत का? की कुणीही येऊन टेबलावर बसतो?” असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांची गफलत होत असून दलालशाही व गैरव्यवहारास खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाचे स्पष्ट आदेश असूनही काही कार्यालयांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत सुरू असलेल्या या उघड गैरव्यवस्थेकडे ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शासनाच्या आदेशांचा धाक फक्त कागदापुरता राहणार का, की प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार? हा प्रश्न आता थेट प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

#Lokvrutt News @lokvruttnews @LOKVRUTT.COM #Maharashtra #GovernmentOrder #IdentityCard #GovtEmployees #शासनपरिपत्रक