आर्थिक पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी ; देसाईगंज काँग्रेसमध्ये खळबळ

441

— आमदारांच्या कामकाजावर नाराजी, निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का

लोकवृत्त न्यूज
देसाईगंज :- नगर परिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर देसाईगंज काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाला दीर्घकाळ आर्थिक पाठबळ देणाऱ्या आणि संघटनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्याने अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस गोटात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील अंतर्गत गोंधळ, दुर्लक्ष आणि स्थानिक आमदाराच्या कार्यशैलीबद्दल निर्माण झालेली तीव्र नाराजी यामुळे संबंधित कार्यकर्त्याने पक्षत्यागाचा निर्णय घेतला. परिस्थिती हाताळण्यासाठी आमदार वडेट्टीवार आणि स्थानिक आमदार यांनी त्यांच्या घरी भेट देऊन मनधरणी केली, मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे समजते.
पक्षाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणारा आणि अनेक वर्षे संघटनेला आधार देणारा कार्यकर्ता निघून गेल्याने काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “आता आणखी कोण जाणार?” आणि “उरलेल्यांना कसे थांबवणार?” अशा चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.
देसाईगंज काँग्रेससमोर आता असंतुष्टांचे समाधान आणि संघटन वाचवण्याचे आव्हान उभे राहिले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.