गडचिरोली नगर परिषद निवडणुक : उमेदवारांची शपथपत्रे संकेतस्थळावर अद्याप गायब

182

कासवगती प्रशासन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक अगदी दारात येऊन ठेपली असतानाच येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली, छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आणि चिन्ह वाटपही झाले; मात्र सर्वांत महत्त्वाची असलेली शपथपत्रे निर्णय अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर अद्याप अपलोडच करण्यात आलेली नाहीत.
जिल्ह्यातील देसाईगंज आणि आरमोरी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारांची शपथपत्रे वेळेत उपलब्ध करून दिली आहेत. परंतु गडचिरोली नगर परिषदेच्या निर्णय अधिकाऱ्यांकडून अजूनही शपथपत्रे अपलोड न झाल्याने प्रशासनाची कामगिरी कासवगतीची असल्याचे चित्र नागरिकांसमोर आले आहे.
निवडणुकांमध्ये उमेदवारांचा गुन्हेगारी, आर्थिक व वैयक्तिक तपशील जाणून घेण्यासाठी शपथपत्र हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. पारदर्शकतेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला ही माहिती सहज मिळणे आवश्यक आहे. परंतु गडचिरोलीतील स्थिती याच्या उलट दिसत असून, शपथपत्रे अद्याप उपलब्ध न करण्यामागील कारण काय? असा सवाल नागरिकांतून जोरदारपणे विचारला जात आहे.
निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांची ही दिरंगाई केवळ प्रशासनावरच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.