– सरकारी शिक्क्याखाली अवैध उत्खनन व विक्रीचा धंदा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली / प्रतिनिधी : मौजा वाघोली येथील शासकीय रेती डेपो सध्या शासनाच्या ताब्यात आहे की ठेकेदाराच्या मर्जीवर चालतो आहे, असा गंभीर आणि संतापजनक प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय डेपो असतानाही येथे एकही शासकीय कर्मचारी नियमितपणे उपस्थित नसल्याने ठेकेदाराने संपूर्ण डेपोवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित केल्याचे चित्र दिसून येत आहे.
रेती उपसा, माती व मुरूम उत्खननाबाबत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवले जात असून, ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने उत्खनन करून रेती, माती व मुरूमाची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशेष म्हणजे, स्थानिक गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ही रेती बाहेरील गावांना विकली जात आहे.
या बेकायदेशीर कारभारामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, घरकुल योजना, वैयक्तिक बांधकाम व शासकीय कामांसाठी स्थानिक नागरिकांना शासकीय डेपो असूनही रेती मिळत नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
सर्व प्रकार शासनाच्या नाकाखाली सुरू असतानाही महसूल, खनिकर्म व संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. वाघोली रेती डेपो हा शासकीय महसूलाचा स्रोत की रेती माफियांचे आर्थिक केंद्र? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तातडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, तसेच डेपोवर शासकीय कर्मचारी व सीसीटीव्ही व्यवस्था त्वरित कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.










