३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह ८ ते १२ जानेवारीदरम्यान
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.०५ : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातून दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देत त्यांच्या सुप्त प्रतिभेला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
या शैक्षणिक सप्ताहात राज्यातील १५ अंध विद्यालयांतील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्यासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, काव्यवाचन, गायन, ब्रेल वाचन, नृत्य, निबंध लेखन, मनाचे श्लोक व प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन तसेच बक्षिसांची संपूर्ण व्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व सामाजिक बांधवांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आयोजकांनी दानदाते व संस्थांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
८ जानेवारी रोजी सकाळी दृष्टीहीन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शहरातून काढण्यात येणार असून समाजात जनजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमात गडचिरोलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गडचिरोलीकरांच्या मनोरंजनासाठी रोशनी म्युझिकल ग्रुप, नागपूर यांचा भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “अशी रंगली रात्र” या कार्यक्रमातून एक संस्मरणीय सांस्कृतिक संध्या रसिकांना अनुभवता येणार आहे.
या शैक्षणिक सप्ताहाच्या आयोजनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस भोजराज पाटील (उपाध्यक्ष, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र), सुहास खरे (अध्यक्ष, माऊली मित्र मंडळ, नागपूर), निरंजन वासेकर (अध्यक्ष, मैत्री परिवार, गडचिरोली), अविनाश चडगुलवार (सचिव, मैत्री परिवार), अश्विनी भांडेकर (महिला प्रमुख, मैत्री परिवार), प्रकाश मुद्दमवार (सभासद, मैत्री परिवार) व प्रमोद धात्रक (सभासद, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र) हे मान्यवर उपस्थित होते.
दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास, संधी आणि समानतेचा संदेश देणारा हा शैक्षणिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











