करपाडा चक प्रकरणी एसडीओ कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन
लोकवृत्त न्यूज
आरमोरी दि.१० :- आरमोरी तालुक्यातील करपाडा चक येथील सर्व्हे क्र. १५७/१ क्षेत्र ३.८८ हेक्टर जागेतून रेती निष्कासनास दिलेल्या मंजुरीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, लाचखोरी, नियमभंग व प्रशासकीय संगनमताचा गंभीर आरोप करत सुरज अशोक हजारे यांनी उपविभागीय अधिकारी, देसाईगंज कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडले आहे.
सदर जमीन ही मृत खातेदारांच्या नावावरील सर्व्हे क्र. १५७ मधून नियमबाह्य पद्धतीने पोटहिस्सा करून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आली होती. या जमिनीवर यापूर्वी भुईमूग पीक घेतले जात होते, हे सर्वश्रुत असताना प्रत्यक्षात रेती अस्तित्वात नसतानाही तब्बल ३७ हजार ब्रास रेती असल्याचा बनावट अहवाल भुजल सर्वे अधिकाऱ्यांनी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भुमी अभिलेख विभागाने पावसाळी कालावधीत केलेल्या संशयास्पद सर्वेक्षणात वाळू असल्याचे नमूद केले असले, तरी फेर सर्वेक्षणात कोणतीही ठोस नोंद न करता प्रकरण पुढे रेटण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात वाळूमाफिया व वर्गे यांच्या दबावाखाली, गौण खनिज प्रकरणात यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले उपविभागीय अधिकारी प्रसनजीत प्रधान, नियमबाह्य पोटहिस्सा प्रकरणातील आरमोरी तहसीलदार तसेच इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. कोणतीही सखोल चौकशी न करता, तक्रारकर्त्याला पूर्णतः अंधारात ठेवून, उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी सदर रेती प्रस्ताव मंजूर करून तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रशासकीय नियमांची सर्रास पायमल्ली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर व भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाल्याने, सदर प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करावी व त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी हजारे यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.














