गडचिरोलीत २२ फेब्रुवारीला तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळाव्याचे आयोजन

200

गडचिरोलीत २२ फेब्रुवारीला तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळाव्याचे आयोजन

​लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२१:-समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली शहरात भव्य ‘तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आरमोरी रोडवरील संताजी स्मृती प्रतिष्ठान येथे हा सोहळा पार पडणार आहे.
​हा मेळावा द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था व समाज सदस्यांच्या सहकार्याने, तसेच ‘Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd.’ यांच्या संयुक्त नियोजनातून संपन्न होत आहे. एकाच ठिकाणी अनेक योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करून देणे, वेळ व खर्चाची बचत करणे आणि हुंडामुक्त विवाहांना प्रोत्साहन देऊन सामाजिक नाते दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

​या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका योगिता प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून विदर्भ महाराष्ट्र तेली महासभेचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे उपस्थित राहतील. या सोहळ्याचे अध्यक्षपद संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरजी वासेकर भूषविणार आहेत.
​यावेळी गडचिरोली नगरपरिषदेचे मान्यवर पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता, शिक्षक, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​समाजातील वधू-वर तसेच पालकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पाल्यांसाठी योग्य स्थळ निवडीची संधी घ्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती परिश्रम घेत आहे.