• गडचिरोलीत नळाला येते वंगणाच्या रंगासारखे काळे पाणी; नगर परिषदेच्या कारभारावर संताप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- शहरातील रामनगर परिसरात नगर परिषदेच्या नळयोजनेद्वारे वंगणाच्या रंगासारखे काळेकुट्ट पाणी पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नळातून येणारे हे काळसर पाणी पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पाण्याचा वापर पिण्यासाठी किंवा दैनंदिन कामांसाठी कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी रामनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सभापती निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असून जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. “जनतेच्या आरोग्याची काळजी घेता येत नसेल, तर जबाबदारीचे पद सांभाळण्याचा अधिकार काय?” असा संतप्त सवाल रामनगरवासीयांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, खासगी स्तरावर दूषित पाणी विक्री करणाऱ्यांवर किंवा इतर किरकोळ नियमभंगांवर प्रशासन तत्काळ कारवाई करते. मात्र नगर परिषदेकडूनच अशा प्रकारे संशयास्पद आणि काळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप होत असताना संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रामनगर परिसरातील पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून वस्तुस्थिती जाहीर करावी, दोषींवर कारवाई करावी आणि नागरिकांना त्वरित स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.














