प्रामाणिकपणाचे उदाहरण : सापडलेला मोबाईल गडचिरोली पोलिसांच्या केला स्वाधीन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली-धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालय परिसरात सापडलेला एक मोबाईल फोन प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करून एका नागरिकाने सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा रोडवरील शिवाजी कॉलेजजवळ रियल मी कंपनीचा मोबाईल फोन सुमित सोनेकर यांना आढळून आला. मोबाईलचा मालक शोधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने त्यांनी तत्काळ गडचिरोली पोलीस ठाणे गाठून सदर मोबाईल पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या स्वाधीन केला.
दरम्यान, संबंधित मोबाईलचा मालकाने आवश्यक ओळख व पुरावे सादर करून गडचिरोली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल हरवलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात भेट देऊन आपला मोबाईल ताब्यात घ्यावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुमित सोनेकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत असून, अशा कृतीमुळे समाजात विश्वास आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.














