गडचिरोलीत पाण्याचा हाहाकार, सभापतींचे ‘Only WhatsApp Call’ स्टेटस ठरले चर्चेचा विषय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गडचिरोली शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
पाणीटंचाईच्या वाढत्या संकटामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असताना नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून गोसेखुर्द धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या संबंधित सभापतींच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
शहरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आणि समस्या मांडण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सभापतींचा मोबाईल अनेकदा उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरील ‘Only WhatsApp Call’ हे स्टेटस सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनेक प्रभागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. तसेच पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी जनतेसमोर येऊन सद्यस्थिती स्पष्ट करावी व भविष्यातील नियोजन जाहीर करावे, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनीही समन्वय साधून पाणीटंचाईच्या संकटावर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.














