सोलर वितरकांचा एल्गार : गडचिरोलीत सौर निर्णयाविरोधात निवेदनातून निर्बंध हटवण्याची मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ : महावितरणने निवासी सौर ग्राहकांसाठी लागू केलेल्या नव्या धोरणामुळे सौर क्षेत्रात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे सोलर वितरकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सौर क्षमतेवर घालण्यात आलेले निर्बंध तात्काळ हटवावेत, या मागणीसाठी सोलर वितरक व ऊर्जा क्षेत्रातील प्रतिनिधींनी MSEDCLच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १३ फेब्रुवारीपासून पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर क्षमतेच्या मंजुरीसाठी ग्राहकांच्या मागील १२ महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या तसेच भविष्यातील विजेच्या गरजांचा विचार करून सौर क्षमता निवडण्याची मुभा होती. मात्र या अचानक निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५० ते ६० टक्के निवासी सौर ग्राहकांवर थेट परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या धोरणात्मक बदलाबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना, परिपत्रक किंवा उद्योग सल्लामसलत न करता थेट ऑनलाइन पोर्टलवर नियम लागू करण्यात आल्याने सौर वितरकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी पसरली आहे. आधीच नोंदवलेल्या सौर ऑर्डर्स धोक्यात आल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
नवीन बांधकाम असलेल्या घरांमध्ये वीज वापराचा इतिहास अत्यल्प असल्याने अशा ग्राहकांना गरजेपेक्षा कमी सौर क्षमता मंजूर होत आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये अनेक मीटर्सच्या एकत्रित वापराऐवजी एका मीटरच्या मागील वापरावर मर्यादा लादली जात असल्याने मोठ्या सौर प्रकल्पांना ब्रेक लागला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
पीएम सूर्यघर योजनेच्या उद्दिष्टांवर धोका
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी PM Surya Ghar Yojana देशभरात निवासी सौर ऊर्जेला चालना देत आहे. मात्र महावितरणच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा स्वीकार मंदावण्याची भीती व्यक्त होत असून, योजनेच्या यशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्राहकांना त्यांच्या वास्तविक तसेच भविष्यातील विजेच्या गरजेनुसार सौर क्षमतेची निवड करू द्यावी, मागील १२ महिन्यांच्या वापरावर आधारित निर्बंध रद्द करावेत, तसेच ऑटो लोड एक्स्टेंशनची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशा ठोस मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही सोलर वितरकांनी दिला आहे.











