Home गडचिरोली चिमण्यांच्या संवर्धनासाठी लॉयड्स मेटल्सचा पुढाकार

चिमण्यांच्या संवर्धनासाठी लॉयड्स मेटल्सचा पुढाकार

209

• वर्ल्ड स्पॅरो डे निमित्त विद्यार्थ्यांत जनजागृती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २३ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे जागतिक चिमणी दिन निमित्त हेडरी येथील लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
सुरजागड आयर्न आणि खाण प्रकल्पाच्या पर्यावरण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात संवादात्मक सत्र घेण्यात आले. यामध्ये चिमण्यांची भूमिका कीटक नियंत्रण, बियांचे प्रसारण तसेच पर्यावरणाच्या आरोग्याचे निदर्शक म्हणून किती महत्त्वाची आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना चिमण्यांची झपाट्याने घटणारी संख्या ही शहरीकरण, अधिवासाचा ऱ्हास, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होत असल्याची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीशी या समस्यांचा संबंध जोडत वास्तवदर्शी चित्रही उभे करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. पक्ष्यांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था करणे, घरटी बसविण्यासाठी बॉक्स तयार करणे तसेच नैसर्गिक अधिवासाचे जतन करणे यांसारखे सोपे उपाय अंगीकारण्यास प्रेरित करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन जैवविविधता संवर्धनासाठी सकारात्मक पावले उचलण्याची प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Don`t copy text!