• ४ कोटींच्या थकबाकीमुळे गडचिरोली सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालक जिल्ह्यातच आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ उघड झाला असून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह आठ शासकीय रुग्णालयांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे आंशिक स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. सुमारे चार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणने ही कठोर कारवाई केल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ वीजबिल न भरल्यामुळे वीज विभागाने अखेर थेट पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी उपचार सुरू असलेल्या विभागांचा वीजपुरवठा कायम ठेवण्यात आला असून निवासी क्वार्टर्स, काही प्रशासकीय कार्यालये आणि इतर विभागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कर्मचारी संतप्त; प्रशासनावर गंभीर सवाल
या कारवाईनंतर रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आमच्या पगारातून वीज व पाणी बिलाची नियमित कपात होत असताना संबंधित रक्कम वेळेत भरली का नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
अंधारात कर्मचारी कुटुंबे ; विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णालय परिसरातील १७८ निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचारी कुटुंबांवर संकट कोसळले आहे.
तसेच परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील सुमारे २०० विद्यार्थिनी अंधारात राहण्यास मजबूर झाल्या असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांनाही याचा मोठा फटका बसत असून डासांच्या त्रासात रात्र काढावी लागत असल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विशेष लक्षातील जिल्ह्यातच अशी परिस्थिती उद्भवल्याने जिल्ह्याच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
“स्टील हब” स्वप्नावर प्रश्नचिन्ह?
जिल्ह्याला “स्टील हब” बनवण्याची घोषणा होत असताना आरोग्य सेवेतीलच वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित होणे, ही बाब गंभीर असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी अवस्था असेल, तर इतर जिल्ह्यांचे काय?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आरोग्य यंत्रणेतील या निष्काळजीपणावर जबाबदारी निश्चित होणार का, आणि वीजपुरवठा सुरळीत कधी होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.














