चंद्रपूरला पहिली महिला जिल्हाधिकारी ; IAS वसुमना पंत यांची नियुक्ती
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर :- आयएएस अधिकारी वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्या जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. त्या यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
मावळते जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडून पंत यांना कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गौडा यांनी जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे.
नागपूरमध्ये कार्यरत असताना पंत यांनी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ‘डीप क्लीनिंग’ व इको-फ्रेंडली उपक्रमांमुळे त्या विशेष चर्चेत राहिल्या.
२०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या पंत यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम करत अनुभव मिळवला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर प्रशासनात नवी ऊर्जा येण्याची अपेक्षा आहे.











