Home Breaking News गडचिरोली : भाजीपाला विक्रेत्या दोन बहिणींना बँक कर्मचाऱ्यानेच घातला ४८ लाखांचा गंडा,...

गडचिरोली : भाजीपाला विक्रेत्या दोन बहिणींना बँक कर्मचाऱ्यानेच घातला ४८ लाखांचा गंडा, आरोपी अटकेत

871

गडचिरोली : भाजीपाला विक्रेत्या दोन बहिणींना बँक कर्मचाऱ्यानेच घातला ४८ लाखांचा गंडा, आरोपी अटकेत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ : कष्टाने भाजीपाला विक्री करून आयुष्यभराची पुंजी जमविणाऱ्या दोन गरीब बहिणींना बँक खाते उघडून देण्याच्या बहाण्याने एका बँक कर्मचाऱ्याने तब्बल ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांनी गंडा घातल्याचा संतापजनक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला आहे. विश्वासाचा गैरफायदा घेत खात्यांवर ताबा मिळवून आरोपीने रोख, ऑनलाइन आणि परस्पर व्यवहारांद्वारे लाखो रुपये लाटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती चौक परिसरात राहणाऱ्या जुली मारोती शिरपूरकर (वय ३५) आणि त्यांची बहीण सविता पोहनकर या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. आरोपी मिथुन प्रभाकर गायकवाड (रा. खेडेगाव, ता. कुरखेडा) हा खासगी बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याने दोन्ही बहिणींचा विश्वास संपादन करून त्यांना एचडीएफसी व ॲक्सिस बँकेत प्रत्येकी दोन खाती उघडून दिली. मात्र, खात्यांचे संपूर्ण नियंत्रण स्वतःकडे ठेवत त्यांच्या नकळत आर्थिक व्यवहार सुरू केले.

तपासात आरोपीने फिर्यादींना कोणतीही माहिती न देता रोख स्वरूपात २८ लाख ५४ हजार रुपये, संमतीशिवाय ८ लाख रुपये, तसेच ऑनलाइन पद्धतीने ११ लाख ८३ हजार ७८७ रुपये काढल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे एकूण ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून या कष्टकरी बहिणींची फसवणूक करण्यात आली.

खात्यातील व्यवहारांबाबत संशय आल्याने जुली शिरपूरकर यांनी आरोपीकडे विचारणा केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही बहिणींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी मिथुन गायकवाड याला अटक केली.  न्यायालयात हजर केले’ असता पुढील तपासासाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

दरम्यान, गरीब महिलांची मेहनतीची कमाई लाटणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीकडे बँक खाते, ओटीपी, एटीएम पिन किंवा मोबाईल बँकिंगची माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!