ठानेगाव येथील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू ; गळफास अवस्थेत मृतदेह आढळला

178

ठानेगाव येथील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू ; गळफास अवस्थेत मृतदेह आढळला

लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि.०३ : तालुक्यातील ठानेगाव येथील नंदू बाळू भूरसे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदू भूरसे हे काल सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घरातून पाणी पिऊन बाहेर पडले होते. मात्र, दिवसभर ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच सुमारे १२ वाजेपर्यंत शोधमोहीम राबवूनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, आज पहाटे पुन्हा ५.३० वाजल्यापासून शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर सकाळी सुमारे ७.४५ वाजता रामाळा गावाजवळील अरुण चापले यांच्या शेतातील बांधकाम सुरू असलेल्या बांधकामस्थळी नंदू भूरसे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मृत नंदू भूरसे यांच्या पश्चात पत्नी रेखा भूरसे व दोन मुले — सुमित व अमित भूरसे असा परिवार आहे. या घटनेमुळे ठानेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.