Home Breaking News भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

637

अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार

लोकवृत्त न्यूज
धानोरा, :- मुरूम-सावरगाव मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना 13 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मृतकाचे नाव मनीराम धुर्वे (रा. मरकागाव, ता. धानोरा) असे असून, गंभीर जखमीचे नाव नरसुराम पोटावी (वय 41, रा. मरकागाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीराम धुर्वे व नरसुराम पोटावी हे दोघे काही खासगी कामानिमित्त मर्मा येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकीने आपल्या गावाकडे परतत असताना मुरूम-सावरगाव मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकी चालक मनीराम धुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नरसुराम पोटावी यांचा एक हात व एक पाय मोडून ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सावरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
दरम्यान, अपघात घडवून ट्रक चालक वाहनासह पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून फरार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Don`t copy text!