Home Breaking News आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव?; खासगी कंपनी व दलालांविरोधात संताप

आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव?; खासगी कंपनी व दलालांविरोधात संताप

53

•करारनामे रद्द करून दोषींवर कठोर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसची निवेदनातून मागणीन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कथितरित्या अधिग्रहित करण्याच्या प्रयत्नांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या हरी ओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड, हैदराबाद या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणातील दलालांना शिक्षा द्यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, शासनाचा कोणताही अधिकृत आदेश अथवा अधिसूचना नसताना जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. काही दलालांनी आदिवासींच्या अशिक्षितपणाचा आणि माहितीअभावी असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत जमिनी हडपण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना आगाऊ रक्कम देऊन करारनामे करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे १०० एकरांहून अधिक जमीन करारबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित करारनामे तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गहूबोडी गावाच्या सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन अधिग्रहणासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत गावातील कोणत्याही जमिनीच्या अधिग्रहणास मंजुरी देऊ नये, असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, शासनाची परवानगी मिळाल्याचे खोटे भासवून वारसदार आणि नातेवाईकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही दलालांकडून केला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. आदिवासींच्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष निकेश गद्देवार, रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सुधीर बांबोडे, राकेश तोरे, सूर्यकांत शेडमाके, देवाजी कुळमेथे, विशाल सोयाम, भगवान कुळमेथे, यशवंत कुडमथे, रत्नदीप कुळमेथे, शुभम मडावी, भास्कर कुळमेथे, यमाजी कोडाप, नरेश कुळमेथे व नागराज कुळमेथे आदींचा समावेश होता.

Don`t copy text!