जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत पंचसूत्री कार्यक्रमांची घोषणा

181

– आदिवासी समाजाच्या संघटन व प्रबोधनासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सज्ज

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात पंचसूत्री जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजात संघटन, जागृती आणि सामाजिक ऐक्याला चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार व परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पंचसूत्रात कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्यांची जाणीव आणि स्वजागृती या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, गावोगावी जाऊन विशेष जनजागृती अभियान राबवले जाणार आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विकास परिषदेच्या युवा शाखेच्या वतीने भव्य रॅली आणि मॅरेथॉनचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल, असा विश्वास परिषदेकडून व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, उपाध्यक्ष वामन जुनघरे, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, तसेच उमेश ऊईके, सुरज मडावी, मुकुंदा मेश्राम, विद्या दुग्गा, मालता पुडो आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवी दिशा तयार होईल, अशी अपेक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात येत आहे.