एटापली-जीवनगट्टा मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात ; अपघात झाला तर जबाबदार कोण ?

35

एटापली-जीवनगट्टा मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात ; अपघात झाला तर जबाबदार कोण ?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली / एटापली : गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याची स्वप्ने दाखवली जात असताना एटापली शहरालगतचा एटापली-जीवनगट्टा मार्ग मात्र अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळ्याच्या तडाख्याने हा रस्ता इतका उखडला आहे की रस्ता ओळखण्यापेक्षा खड्डे मोजणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या भाषेत सांगायचे झाल्यास हा रस्ता आता रस्त्यापेक्षा अपघातस्थळच अधिक दिसत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, तर दुसरीकडे सुरजागड कंपनीची अवजड वाहने दिवसरात्र धावत असल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. खड्ड्यांत पाणी साचल्याने कुठल्याही क्षणी जीवघेणा अपघात होऊ शकतो, परंतु प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गाढ झोपेत आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तजन संकटातून मुक्तीची प्रार्थना करत असताना गावकऱ्यांसमोरचा हा रस्त्याचा रावण डोळे वटारून उभा आहे. लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर मौन बाळगून आहेत. ग्रामस्थ आणि प्रवाशांनी संताप व्यक्त करून थेट सवाल उपस्थित केला आहे की, जर अपघात होऊन एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण ठरणार? सुरजागड कंपनीच्या कोट्यवधींच्या निधीचा नेमका वापर कुठे होतो? गावकऱ्यांच्या सुरक्षेला काही किंमत नाही का? या मार्गामुळे गावाकडे जाणे म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे.
शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून जर तात्काळ रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली नाही तर ग्रामस्थ आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.