महिला दिन : तिच्या अस्तित्वाच्या सन्मानाचा दिवस
नकोत फक्त शब्दांच्या फुलांच्या माळा,
सन्मान तिच्या अस्तित्वाचा व्हावा…
महिला दिनाच्या या शुभ दिनी,
तिच्या जिद्दीचा नवा ‘हुंकार’ घुमावा
८ मार्च… जागतिक महिला दिन! हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा नाही, तर स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग आणि तिच्या असीम शक्तीला सलाम करण्याचा दिवस आहे. आजही जेव्हा एखादी स्त्री आरशासमोर उभी राहते, तेव्हा तिला केवळ स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही. त्या काचेच्या मागे डोकावले, तर आजही पिढ्यानपिढ्या दाबून ठेवलेले हुंदके स्पष्ट ऐकू येतात. हे ते हुंदके आहेत, जे कधी ‘कर्तव्या’पोटी तर कधी ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी ओठाबाहेर येऊ शकले नाहीत. एका स्त्रीचा जन्म होतो तेव्हापासूनच तिच्यावर ‘संस्कारांच्या’ नावाखाली अनेक बंधने लादली जातात, पण तिच्या मनातील इच्छांचा विचार मात्र कोणालाच पडत नाही.
स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही; ती आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण अशा प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून देते. पण या प्रत्येक नात्यामागे तिचं एक वेगळं विश्व असतं—स्वप्नांचं, आशांचं आणि अनेकदा न बोललेल्या वेदनांचं. घराची चौकट सांभाळताना ती स्वतःच्या आनंदाला अनेकदा मुरड घालते. जगाला तिचं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागे दडलेले ‘वितळलेल्या लोखंडासारखे’ अश्रू कोणालाच दिसले नाहीत. दुसऱ्यांच्या चुलीसाठी लाकूड होऊन जळता जळता ती स्वतःच्या अस्तित्वाची राख करते, पण त्या राखेला मायेने स्पर्श करणारं कुणी नसतं. आजही समाजात स्त्रीला ‘दुय्यम’ स्थान देण्याची मानसिकता पूर्णपणे संपलेली नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
पण आजची स्त्री केवळ सहन करणारी उरलेली नाही, ती संघर्षातून उगवलेली एक ‘शक्ती’ आहे. स्वराज्य घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, त्यागाची आणि संयमाची मूर्ती असणाऱ्या माता रमाई, शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले, देशाचे खंबीर नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळात झेप घेणारी कल्पना चावला आणि आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असोत; या सर्वांनी सिद्ध केले आहे की स्त्री शक्ती ही अफाट आहे. ती आता केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता, आकाशाला गवसणी घालत आहे. ती आता अन्यायाला प्रश्न विचारते आणि स्वतःची ओळख निर्माण करते. तिने ओळखलं आहे की, जोपर्यंत ती स्वतःचा सन्मान करत नाही, तोपर्यंत हे जग तिचा आदर करणार नाही.
राखेचा काळ आता संपला असून, त्या राखेचा ‘अंगारा’ होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आपण कोणाची तरी ‘सावली’ नाही, तर आपण स्वतः एक प्रखर ‘सूर्य’ आहोत. स्त्रीने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आपलं नशीब कपाळावरच्या रेषांमध्ये नाही, तर आपल्या कष्टाच्या हातांमध्ये असतं. कारण तू फक्त आयुष्य जगत नाहीस, तर तू हे संपूर्ण आयुष्य आणि समाज घडवत असतेस. या महिला दिनी आपण संकल्प करूया की, स्त्रीचा सन्मान हा केवळ एक दिवसाचा सोहळा न राहता, तो तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनावा.
नशीब आपले आता तिने
स्वतःच नव्याने लिहायचे,
सोडून साऱ्या बेड्यांना
अजिंक्य होऊन जगायचे!
जागतिक महिला दिनाच्या सर्व रणरागिणींना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏
लेखिका : प्रियंका वाकडे
(Kavyank stories)
मु. निकतवाडा पो. घोट ता. चामोर्शी
जि. गडचिरोली
मो नं 9404959523











