उधारीच्या पैशांच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या : गडचिरोलीत खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१६ :- शहरातील लांझेडा परिसरात उधारीच्या पैशांच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवार (१६ मार्च) रोजी दुपारी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून जिल्हा मुख्यालयातच घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेत सचिन रामचंद्र कोलूरवार (रा. विवेकानंदनगर, गडचिरोली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लांझेडा परिसरातील काही आरोपी फर्निचरचे काम करतात. मृतक सचिन रामचंद्र कोलूरवार यांनी त्यांना काही रक्कम उधारीने दिली होती.
दरम्यान, उधारीचे पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी ते एक-दोन दिवसांत देण्याचे सांगून सचिन यांना आज पैसे घेण्यासाठी बोलाविले होते. पैसे घेण्यासाठी ते तेथे गेले असता त्यांच्यावर हल्ला करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, भरदिवसा युवकाची हत्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.














