Home गडचिरोली करपडा चक वाळू उत्खननात अनियमिततेचे आरोप; दोषींवर कारवाईची मागणी

करपडा चक वाळू उत्खननात अनियमिततेचे आरोप; दोषींवर कारवाईची मागणी

373

करपडा चक वाळू उत्खननात अनियमिततेचे आरोप; दोषींवर कारवाईची मागणी

लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि. १६ : तालुक्यातील करपडा चक येथील सर्व्हे क्र. १५७ मधील वाळू उत्खनन प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सूरज अ. हजारे, शंकर का. ढोलगे व रवींद्र सेलोटे यांनी माध्यमांशी संवाद साधत संबंधित अधिकारी व वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व्हे क्र. १५७ मधील खातेधारक राजाराम पांडुरंग गेडाम उर्फ राजमशहा पांडुरंग गेडाम यांचे दि. १९ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले असतानाही दि. १९ मे २०२५ रोजी झालेल्या पोटहिस्सा मोजणीवेळी त्यांना उपस्थित दाखवून सदर सर्व्हे क्र. १५७ चे दोन हिस्से करण्यात आले. हा प्रकार वाळू उत्खननासाठी काही वाळू माफियांना लाभ मिळावा यासाठी भूमिअभिलेख विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच सर्व्हे क्र. १५७/१ येथे पुरामुळे वाळू साचल्याचे कारण देत वाळू निष्कासनासाठी पेसा क्षेत्रातील ग्रामसभेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असताना संबंधितांकडून बनावट ग्रामसभा प्रमाणपत्र तयार करून सादर केल्याचा दावा करण्यात आला. ग्रामपंचायतीकडे याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसून अशी ग्रामसभा झालेली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय उपधीक्षक भूमिअभिलेख, भूजल सर्वेक्षण विभाग तसेच कृषी व पाटबंधारे विभागांनी सादर केलेले अहवालही दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित क्षेत्रात वाळू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान त्या ठिकाणी भुईमूग पिकाची लागवड असल्याचे आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर बनावट कागदपत्रे तयार करणे व चुकीचे अहवाल सादर करणे याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

#Gadchiroli #Armori @lokvrutt.com #SandMining #IllegalSand #PressConference

Don`t copy text!