शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजारांची मदत जाहीर करा : बी.आर.एस.पी.ची मागणी

136

– अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन

लोकवृत्त न्यूज
नागपूर :- परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता अक्षरशः रडकुंडीला आला आहे. वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ही नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या विवंचनेत आणखी भर घालत आहे.
अशा परिस्थितीत पंचनाम्याच्या नावाखाली वेळ घालवू नये, तर तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बी.आर.एस.पी.) तर्फे करण्यात आली आहे. पक्षाच्या विदर्भातील सर्व जिल्हा आणि विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि कृषीमंत्री यांना निवेदन दिले.
निवेदनात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करून थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले. शिष्टमंडळात जिल्हा सचिव अरविंद वाळके, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई कांबळे, उर्मिला रायपुरे, रेखाताई कुंभारे, आवडती वाळके, विलास कुंभारे, आकाश बांबोळे, तुषार रामटेके, विलास खोब्रागडे, चंद्रकांत रायपूरे, मिथुन गेडाम, दंबजी रायपूरे, सुधाकर गेडाम, चंदुलाल गेडाम, चंद्रप्रकाश गेडाम यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बी.आर.एस.पी.ने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दु:खात खऱ्या अर्थाने सहभाग नोंदवून तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.