जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्षही पदभार घेईनात… शपथग्रहणाला ‘मुहूर्त’ न मिळाल्याने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज ठप्प

416

जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्षही पदभार घेईनात… शपथग्रहणाला ‘मुहूर्त’ न मिळाल्याने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज ठप्प

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१ जानेवारी :- गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. विशेष बाब म्हणजे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आलेले असतानाही अद्याप त्यांनी पदभार व शपथग्रहण केलेले नाही. त्याचप्रमाणे नगरसेवकांनीही पदभार स्वीकारलेला नसल्याने तीनही नगर परिषदांचा कारभार पूर्णतः ठप्प झाला आहे.
नगर परिषदेत कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना “शपथग्रहण झालेले नाही, पदभार घेतलेला नाही” असेच सांगितले जात असून, लोकनिर्वाचित प्रतिनिधी प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारत नसल्यामुळे नागरिकांची अत्यावश्यक कामे लटकली आहेत. घरपट्टी, पाणीपुरवठा, बांधकाम परवानग्या, व्यापारी परवाने, स्वच्छतेच्या तक्रारी यांसारख्या विषयांवर निर्णयच होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिले गेले असतानाही “मुहूर्त मिळत नाही” या कारणावर पदभार लांबवला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या सत्तासमीकरणांमुळे शपथग्रहणच रखडल्याचे चित्र शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
जनतेचा कौल मिळाल्यानंतरही जबाबदारी स्वीकारायला मुहूर्त लागतो का? मत मागताना तत्पर असलेले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र पदभार घेण्यास विलंब करत असल्याचा थेट आरोप नगराध्यक्ष व नगरसेवकांवर होत आहे.
नगर परिषद कर्मचारी आपल्या अधिकारमर्यादेत काम करत असले तरी, लोकनिर्वाचित नेतृत्वच अस्तित्वात नसल्याने निर्णयप्रक्रिया पुढे सरकू शकत नाही. ही परिस्थिती लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असून, जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी तरी तातडीने पदभार स्वीकारावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहराचा कारभार मुहूर्ताच्या प्रतीक्षेत ठेवणे जनतेला मान्य नसून, तातडीने शपथग्रहण व पदभार स्वीकारण्यात यावा, अन्यथा नागरिकांचा असंतोष उग्र रूप धारण करू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.
मुहूर्त महत्त्वाचा की जनतेचा कौल? हाच प्रश्न आज तीनही शहरांत घुमत आहे.