रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी

130

रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यातील चपराळा येथील दोन महिलांवर रानटी डुकराने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर भद्रावती ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, चपराळा येथील रहिवासी सरस्वताबाई नवले (वय ६५) व सुनंदा नागपुरे (वय ४५) या दोन्ही महिला चालबर्डी शेतशिवारातील नागपुरे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी जात होत्या. यावेळी अचानक समोरून आलेल्या रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघींनाही गंभीर जखमा झाल्या.
महिलांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. सरपंच विलास लेडांगे, मारुती कोंडेकर, ज्ञानेश्वर सिडाम, हर्षल कुटेमाटे व कपिल झाडे यांनी तत्काळ धाव घेत महिलांना रानटी डुकराच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर जखमींना तातडीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलांची विचारपूस केल्याची माहिती आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व मजूर वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.