प्रफुल्लित केंद्राचा स्तुत्य उपक्रम : कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाला दोन सीलिंग फॅनची भेट
लोकवृत्त न्यूज
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत प्रफुल्लित केंद्रामार्फत क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात एक प्रेरणादायी व सामाजिक जाणिव जपणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट देत संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.
डॉ. प्रफुल्ल पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त शाळेत आले असता, उन्हाच्या तीव्र कडाक्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहन करावा लागणारा उकाडा त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. वर्गातील उष्ण वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ शाळेला सीलिंग फॅन देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे केवळ घोषणा करून न थांबता त्यांनी तत्काळ अंमलबजावणी करत शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक आरामदायी वातावरण निर्माण होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. प्रफुल्ल पाटील म्हणाले, “प्रफुल्लित केंद्राचा मुख्य उद्देश मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास घडवून आणणे हा आहे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष प्रतिभा दडलेली असते. ती ओळखून योग्य संधी व पाठबळ दिल्यास विद्यार्थी निश्चितच मोठे यश मिळवू शकतात.”
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “बोलणारे अनेक असतात; परंतु इतक्या तत्परतेने कृती करणारे फार कमी असतात. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना होणारा उकाड्याचा त्रास कमी व्हावा आणि शिक्षणासाठी आनंददायी वातावरण तयार व्हावे या उद्देशाने दिलेले हे फॅन निश्चितच उपयुक्त ठरतील.” असे सांगत त्यांनी प्रफुल्लित केंद्राचे आभार मानले.
या कार्यक्रमात प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्राप्त झालेल्या ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संचालिका रेश्मा काटकर यांनी केले. तर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोड शब्दांत उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी बिस्मिल्ला नदाफ, जहिदा मुल्ला, राणी पाटील, माधुरी पाटील, सुनीता माने, शुभांगी पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











