गडचिरोलीत भ्रष्टाचाराविरोधात उपोषण तीव्र ; शंकर ढोलगे यांची कडक कारवाईची मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील वनविभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा आंदोलनकर्ते शंकर ढोलगे यांनी १३ तारखेपासून सुरू केलेले उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.
ढोलगे यांनी आरोप केला आहे की, आल्लापल्ली, पेरमिली व पेंडिंगुडाम येथील मूलचेरा वनपरिक्षेत्रात बोगस मजुरांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या व अंगठ्यांचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
तसेच जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून झालेल्या भ्रष्टाचाराची वसुली करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
याशिवाय, चौकशी प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत संबंधित चौकशी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच पेंडिंगुडाम वनपरिक्षेत्रातील संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या सर्व कामांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.











