पोर्ला परिसरात शोककळा
लोकवृत्त न्यूज
आरमोरी दि.२४: तालुक्यातील पोर्ला बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात ई-रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतकाचे नाव गजानन श्रीहरी गुरनुले (वय ५२, रा. अंतरजी, ता. आरमोरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरनुले हे आपल्या मालकीच्या ई-रिक्षासह पोर्ला बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे होते. त्याचवेळी सुधीर अशोक टेंभुर्णे (वय ४३) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत त्या ठिकाणी आला.
नियंत्रण सुटलेल्या ट्रॅक्टरने उभ्या ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गुरनुले खाली कोसळले. दुर्दैवाने, त्याचवेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या दुर्दैवी अपघातामुळे पोर्ला परिसरात शोककळा पसरली असून मृतकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.














